| Abstract: | धर्माचे खरे रहस्य लोकांना समजत नव्हते व म्हणून लोक धर्माच्या नावाखाली बाह्य यांत्रिक कर्मकांड करण्यात, उपासतापास, श्राद्ध, व्रतवैकल्ये, तीर्थयात्रा व मंदिरातून होणाऱ्या पूजा, कीर्तन, प्रवचने करण्यात व ऐकण्यातच खरा धर्म सामावलेला आहे असे समजून त्यांच्याच जंजाळात अडकून पडलेले होते, व अजूनही तोच पोथीनिष्ठ धर्म, तीच पुराणप्रियता लोकजीवनात सर्वत्र कार्य करीत असताना दिसते. पण हे धर्माचे खरे सार व हार्द नाही याची प्रथम जाणीव तीव्रतेने विवेकानंदांना झाली. त्यांनी खऱ्या धर्माची या बाहय उपचारांपासून सुटका करण्याचा मार्ग दाखविला. त्यांच्या मते, धर्म ही मानवाच्या जीवनाची महत्त्वाची गरज आहे. जगण्यासाठी मानवाला जशी अन्न, पाणी, हवा, निवारा, वस्त्र यांची गरज असते तशीच धर्माचीही गरज असते. नुसते खाऊन-पिऊन व सुखचैनीत लोळून माणसाला खरे समाधान मिळत नाही. केवळ भौतिक सुखसमृद्धीची साधने मिळाल्याने मानवाला खरे समाधान लाभते असे नाही. त्याला त्यापेक्षा अधिक, उच्चतर, काहीतरी उदात्त हवे असते; त्याला काहीतरी मोठे, भव्यदिव्य, जीवनाला व मनाला उच्च पातळीवर नेणारे हवे असते. जगातील सर्व धर्म हे चांगलेच आहेत. कोणताही धर्म वाईट नसतो. सर्व धर्माची शिकवण ही योग्य स्वरूपाचीच असते, तिचे आपण सर्वांनी पालन करणे गरजेचे आहे. नीती हाच धर्माचा प्राण आहे, आणि याच भावनेने सर्व मार्गक्रमण करत असतात. कोणीही माझा धर्म श्रेष्ट तुमचा वाईट ही भावना कोणीही ठेवू नये. हे वैश्विक धर्मात अनुस्यूत नसते, असे विवेकानंद म्हणतात. असा व्यापक विचार पुढील पेपर मध्ये व्यक्त केला जाणार आहे. |